परभणी : शहरात २० जून रोजी पहाटे ७ पासून छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसची पथके दाखल झाली आहेत. यात काही भागात घर झडतीची कारवाई सुरू केली आहे. या कारवायामुळे शहरात विविध प्रकारच्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत. एटीएसकडून शहरातील विविध १५ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. कारवाईमध्ये २० पेक्षा अधिक जणांचे पथक आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये धार रोड परिसरात मुमताज कॉलनी, जनता मार्केट जवळ एका दुकानावर, जवाहर कॉलनी यासह काही भागात ही पथके सकाळ पासून घराची झडती घेत आहेत. या सर्व कारवाईमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसचे अधिकारी असून सर्व प्रक्रिये बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
प्रक्रियेला अधिकारी घेऊन आलेली वाहने ही एकाच प्रकारची व त्यावर ठराविक कोडिंग असलेले सिम्बॉल लावले आहे. सर्व पथकासोबत स्थानिक पोलिस यंत्रणेकडून शस्त्रधारी फौजफाटा देखील देण्यात आला आहे.
छावणीचे स्वरूप
स्थानिक पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलेला बंदोबस्त सर्व भागात कारवाईसाठी जाताना मुख्य वसाहत, रस्ते येथे बंदोबस्त तैनात केला जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात या कारवाईमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.
आम्ही बंदोबस्त दिला
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील पथकांकडून सर्च वॉरंट घेऊन नियमित तपासणी प्रक्रिया सुरु आहे. १५ ठिकाणी एटीएस पथकाकडून तपासणी झाली. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून आम्ही बंदोबस्त सोबत दिला आहे.
- तानाजी चिखले, अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी.